॥ पंचतंत्र कथामुखम् ॥ (आरंभ)

 

श्री गणेशाय नमः

 पंचतंत्र कथामुखम् ॥ (आरंभ)

(वृत्त -स्रग्धरा; अक्षरे – 21; गण – म र भ न य य य ; यति- 7, 7, 7. )

ब्रह्मा रुद्रः कुमारो हरिवरुणयमा वह्निरिन्द्रः कुबेर

श्चन्द्रादित्यौ  सरस्वत्युदधियुगनगा वायुरुर्वी भुजङ्गाः।

सिद्धा नद्योऽश्विनौ श्रीर्दितिरदितिसुता मातरश्चण्डिकाद्या

वेदास्तीर्थानि यज्ञा गणवसुमुनयः पान्तु नित्यं ग्रहाश्च॥1

(वृत्त -स्रग्धरा; अक्षरे – 21; गण – म र भ न य य य ; यति- 7, 7, 7. )

रक्षावे नित्य सर्वां विधि, हर, हरिने, स्कंद, अग्नी, यमाने

इंद्राने, सूर्य, चंद्रे, वरुण, उदधिने, यक्षराजा कुबेरे

रक्षावे शारदेने, पवन, अवनिने, सिद्ध वर्गे, भुजंगे

सार्‍या ह्या पर्वतांनी, सकलचि सरिता, दैत्यमाता दितीने ।। 1.1 ।।

लक्ष्मी, देवादिवृंदे, सकल युग सवे चारही वेद यांने

सारी ही पुण्य-तीर्थे, सकल शिवगणे अश्विनी देववैद्ये

रक्षावे चंडिकेने जगत मुनिगणे सर्व यज्ञेच तैसे

आकाशीच्या ग्रहांनी, सकल वसुगणे लोक तीन्ही जपावे ।। 1.2 ।।

( वृत्त – आर्या. )

मनवे वाचस्पतये शुक्राय पराशराय ससुताय।

चाणक्याय विदुषे नमोऽस्तु नयशास्त्रकर्तृभ्यः॥2

( वृत्त – अनुष्टुभ् छंद. )

मनू बृहस्पती शुक्र । व्यास आणि पराशर

चाणाक्ष तोचि चाणक्य । आणि इतर दिग्गज ।। 2.1 ।।

प्रणेते राजनीतीचे(नयशास्त्राचे) । शास्त्रकर्ते बहुश्रुत

नमस्कार असो त्यांना । सर्वकाळ सदोदित ।। 2.2 ।।

 

( वृत्त – आर्या. )

सकलार्थशास्त्रसारं जगति समालोक्य विष्णुशर्मेदम्।

तन्त्रैः पञ्चभिरेतच्चकार सुमनोहरं शास्त्रम्॥3

( वृत्त – अनुष्टुभ् छंद. )

संपूर्ण राजनितीसी । अभ्यासून पुनःपुन्हा

जाणुनी सार त्याचेची । स्वानुभूतीतुनी महा ।। 3.1 ।।

लिहीले विष्णुगुप्तने । पंचतंत्रचि देखणे

शास्त्र हे राजनीतीचे । विलक्षण मनी ठसे ।। 3.2 ।।

श्री गणेशाय नमः ।

( वृत्त – अनुष्टुभ् छंद. )

नत्वा साम्बं शिवं चाऽथ गुरोः पितृपदाम्बुजम्।

सुखाय शिशुबुद्धीनां व्याख्यानमिदमारभे ।। 1 ।।

( वृत्त – अनुष्टुभ् छंद. )

गौरी गिरीश दोघेही । कल्याणकर जे महा

आदरे वंदितो त्यांसी । गुरूसीच तसे पुन्हा

लीन पितृपदी मी हा । प्रारंभ करितो सुखे

नीतिशास्त्रचि सांगाया । बालबुद्धींस नेटके ।।1।।

( अशाप्रकारे (अर्थशास्त्र)राजनतीतज्ज्ञ, अत्यंत बुद्धिमान विष्णुशर्माने स्वरचित पंचतंत्र हा राजनीती सांगणारा ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी  म्हणून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी रचलेला हा मंगलाचरण आहे. )

तर ऐका! दक्षिणेकडे महिलारोप्य नावाचं नगर होतं. तिथे अमरशक्ती नावाचा एक सार्वभौम व मोठा दानी राजा राज्य करत होता. सर्व याचकांसाठी जणु तो कल्पवृक्षासम त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा होता. सर्व श्रेष्ठ राजांचेही मुकुटमणी शोभावेत असे सूर्यासारखे पराक्रमी, तेजस्वी राजे त्याच्या पायावर नित्य वंदन करीत असत. अमरशक्ती कलांमधेही निपुण होता. त्याला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती असे तीन पुत्र होते. पण ते अत्यंत दुष्ट विचारांचे, उद्धट आणि असंस्कृत होते.

अशा ह्या अभ्यासाकडे पाठ फिरवलेल्या आपल्या उडाणटप्पू मुलांना पाहून, त्यांचा विचार करत, राजाने आपल्या मत्र्यांना बोलावलं आणि म्हणाला, ‘‘तुम्हाला सर्वांना माहितच आहे माझ्या ह्या मुलांना ना शिक्षणाची गोडी आहे ना ह्यांना सारासार विचार आहे. अशा ह्या उडाणटप्पू मुलांना पाहून ह्या माझ्या विशाल राज्याचाही आनंद वाटत नाही.  माझं मन विषादानी भरून जातं. कोणीतरी बरोबरच म्हटलं आहे,

मुलगा जन्मलाच नाही वा मृत जन्मला तर त्या गोष्टीचं दुःख काही काळ नक्कीच त्रास देतं. पण काही काळानंतर ते शमतं. पण अभ्यासाची आवड नसलेला उनाडटप्पू मुलगा जर जन्माला आला तर आयुष्यभर दुःखच दुःख प्राप्त होतं. हृदयाला जाळीत राहतं. (4)

(अनुष्टुभ् छंद)

अजातमृत मूर्खेभ्यो   मृताजातौसुतावरम् ।

यतस्तौ स्वल्प दुःखाय   यावज्जीवं जडो दहेत ।। 4 ।।

(अनुष्टुभ् छंद)

ना जन्मे, मृत वा जन्मे, वा जन्मे मूर्ख मूल ते

पर्याय अल्प दुःखाचे । पहिले दोन ह्यातले ।। 4.1 ।।

आयुष्यभर दे पीडा । अडाणी मूर्ख मूल ते

जाळीत हृदया राही । जीवनान्तापर्यंत ते ।। 4.2 ।।

 

एकवेळ गर्भस्त्राव होऊन गर्भ पडून गेला तरी बरे. किंवा मूल मृतच निपजले तरीही चालेल, योग्य काळी स्त्रीशी समागम नाही केला तरी बिघडणार नाही. मुलगी झाली तरीही चालेल. पत्नी वांझ असेल तरीही चालेल. किंवा गर्भ उदरात पडून राहिला तरी बरे पण सुस्वरूप धनवान असा विद्येकडे पाठ फिरवणारा, काहीही शिकायला तयार नसलेला अडाणी मुलगा मात्र कधीही नको. (5)

( वृत्त – शिखरिणी )

वरं गर्भस्त्रावो वर मृतुषु नैवाऽभिगमनं,

वरं जातः प्रेतो वरमपि च कन्यैव जनिता ।

वरं वन्ध्या भार्या वरमपि च गर्भेषु वसति

र्न चाविद्वान् रूपद्रविणगुणयुक्तोऽपि तनयः ।। 5 ।।

/ (अनुष्टुभ् छद)

अडाणी जन्मण्यापेक्षा । गर्भपात बरा गमे

समागम करावा ना । ऋतुकालीच स्त्रीसवे ।। 5.1 ।।

वा जन्मजात मेलेले । मूलही वा बरेचि ते

कन्या जन्मास येणेही । मूर्खापेक्षा बरे असे ।।5.2 ।।

गर्भात पडुनी राहो । वांझही असणे बरे

परी रूप धनादिंनी । युक्त मूर्ख न जन्मणे ।। 5.3 ।।

जी गाय दूधही देत नाही आणि वीतही नाही अशी गाय जशी उपयोगाची नसते त्याप्रमाणे ज्या मुलाकडे ना विद्या आहे ना विद्याभ्यास करायची जिद्द वा निष्ठा! एकवेळ विद्या नसली तर नसो पण ज्याच्याकडे श्रद्धा, नम्रपणा, भक्ती हे नावाला नाहीत असा मुलगा जन्मून काय अर्थ? (6)

(अनुष्टुभ् छंद)

किं तया क्रियते धेन्वा या न सूते न दुग्धदा।

कोऽर्थः पुत्रेण जातेन यो न विद्वान्न भक्तिमान् ।। 6 ।।

(अनुष्टुभ् छंद)

 गाय ती काय कामाची । जी न वीते, न दूध दे

विद्या श्रद्धा न ज्या निष्ठा । व्यर्थ तो पुत्र जन्मणे ।। 6 ।।

एकवेळ स्वतःच्या कुळात जन्मलेल्या पुत्राचा आकस्मात मृत्यू झाला तर काही काळ दु;ख जरूर होते. पण अनैतिक संबंधातून जन्मलेले मूल लोकांमधे जसे वारंवार त्याच्या मायबापांना खाली मान घालायला लावते त्याप्राणे विद्वान, बहुश्रुत लोकांच्या समुदायात न शिकलेला , अभ्यासात रूची नसलेला मुलगा आईवडिलांना कमीपणा आणतो.(7)

( वृत्त- अनुष्टुभ् छंद)

वरमिह वा सुतमरणं मा मूर्खत्वं कुलप्रसूतस्य ।

येन विबुधजनमध्ये जारज इव लज्जते मनुजः ।। 7 ।।

(वृत्त-अनुष्टुभ् छंद)

स्वकुलोत्पन्न पुत्रासी । अनपेक्षित मृत्यु ये

तरी महत्प्रयासाने । सह्य होईल दुःख ते ।। 7.1 ।।

परंतु लाज आणीतो । विद्वानांच्या सभेमधे

विद्याभ्यासी रूची ना ज्या। करंटा पुत्र तो तसे ।। 7.2 ।।

जसे खाली पहायासी । लावे मूल जनीच ते

अनैतिकचि संबंधातुन जे जाहले असे ।। 7.3 ।।

एखाद्या बुद्धिमान लोकांच्या समारंभात  सर्व गुणी लोकांची (हाताचे एकएक बोट उघडून) मोजदाद चालू असतांना एखाद्याचं नाव घेतल्यावर कोणीही विद्वान आपली करंगळी उघडून वर करत नसेल; म्हणजेच त्याला विद्वान म्हणून मान्यता देत नसेल; तर अशा पुत्राचा त्याच्या मायबापांना अभिमान तरी कसा वाटावा? अशा मुलाची आई जर स्वतःला मी ह्या मुलाची आई आहे; मी पुत्रवती आहे म्हणवून घेत असेल तर मग वंध्या कोणाला म्हणावं? (खर तर हा जळजळीत प्रश्न आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष न देणार्‍या पालकांसाठी लेखकाने केला आहे ) (8)

 

( वृत्त – आर्या; मात्रा- 12, 17 12 15   )

गुणिगणगणनारम्भे न पतति कठिनी ससंभ्रमाद्यस्य ।

तेनाम्बा यदि सुतिनी वद वन्ध्या कीदृशी भवति ।। 8 ।।

प्राज्ञांची गणना होता । नाव ज्याचे पुकारता

मोजाया वर ना होई । शरमून करांगुली ।। 8.1 ।।

जरी माय मुलाची त्या । वदे पुत्रवतीच मी

तरी काय म्हणावे ते । सांगावे वांझ स्त्रीसही ।। 8.2 ।।

 

राजा पुढे म्हणाला, म्हणून कसही करून ह्या माझ्या मुलांच्या डोक्यात बुद्धीचा काही प्रकाश पडेल असा काही तोडगा काढा. सध्या माझ्या वेतनावर काम करणारे पाचशे तरी दरबारी विद्वान आहेत. आपल्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे, कसही करून माझं मनोरथ पूर्ण होईल असा काही उपाय शोधा.

राजाचं बोलणं ऐकून तेथे आलेल्या मंत्र्यांपैकी एकजण म्हणाला, ‘‘महाराज, असं म्हणतात की, व्याकरणाचं ज्ञान व्हायला बारा वर्ष लागतात. त्यानंतर मनु आदि विद्वानांनी निर्माण केलेलं धर्मशास्त्र, चाणक्य आणि इतर विद्वानांनी रचलेलं अर्थशास्त्र तसचं वात्स्यायन आणि इतर महर्षींनी लिहीलेलं कामशास्त्र हे सर्व तर शिकायचे राहून जातात. बारा वर्ष व्याकरणाचा अभ्यास केल्यानंतर मगच धर्म, अर्थ आणि काम सांगणार्‍या शास्त्रांचं  ज्ञान मिळवायला लागतं. परत त्यांचं मनन, चिंतन करून जेव्हा त्यांचं उचित ज्ञान होतं तेव्हाच बुद्धीचा विकास होतो.

त्या मंत्र्यांमधेच सुमंत्र नावाचे मंत्री होते. ते म्हणाले, ‘‘माणसाच्या जीवनाची काय शाश्वती?  आणि अशाप्रकारे जर व्याकरण शिकायला बारा वर्ष लागली तर कसं होईल? म्हणून राजपुत्रांची समज वाढवायची असेल तर त्यांना सहज समजेल अशी थोडक्यात शास्त्रांची रचना व्हायला पाहिजे.

 

व्याकरण शास्त्र अत्यंत गहन आणि असीम आहे आणि माणसाचं आयुष्य मात्र मर्यादित! त्यातही नाना विघ्न निर्माण होत राहतात. म्हणून राजहंस ज्याप्रमाणे जलमिश्रित दूधातील फक्त दूध पीतो त्याप्रमाणे, असार गोष्टीतून केवळ सार ग्रहण कराला हवं. (9)

 

( वृत्त – इंद्रमाला/उपजाती )

अनन्तपारं किल शब्दशास्त्रं । स्वल्पं तथायुर्बहवश्च विघ्नाः ।

सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु । हंसैर्यथाक्षीरमिवाम्बुमध्यात् ।। 9 ।।

अनंत हे अक्षर शब्दशास्त्र । आयुष्य थोडे, बहु विघ्न-रास

जलादुधाच्या जंव मिश्रणास । देता पितो हंस जसे दुधास ।। 9.1 ।।

म्हणून सार्‍यातुन तथ्यहीन । टाकून द्यावे न करी विचार

असार टाकूनचि सार घ्यावे । हाची असे निर्णय तो सुयोग्य ।। 9.2 ।।

 

मी तर म्हणतो, आपल्याच सभेमधे विष्णुशर्मा नावाचे एक विद्वान आहेत. ते सर्व शास्त्रांमधे पारंगत आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे सर्व विद्यार्थ्यांमधे प्रिय आहेत. आपल्या राजकुमारांना त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे. राजकुमारांना त्यांच्या हवाली केलं तर ते अत्यंत थोड्या काळात सर्व विद्या ग्रहण करून विद्यासम्पन्न बनतील असा मला तरी पूर्ण विश्वास वाटतो.’’

 

मंत्र्याच्या सांगण्याप्रमाणे राजाने विष्णुशर्मांना बोलावणं पाठवलं आणि त्यांना आपल्या जवळ बोलावून राजा म्हणाला,  ‘‘भगवान! आपण माझ्या मुलांना लवकरात लवकर नीतिनिपुण बनवण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी दर्शवली तर माझ्यावर मोठी मेहरबानी होईल. माझी मुलं नीतिनिपुण झाली तर, मी आपल्याला शंभर गावं इनाम देईन.’’

राजाचे ते बोलणे ऐकून विष्णुशर्मा म्हणाला, ‘‘महाराज! माझं सत्यवचन आपण लक्षपूर्वक ऐका, शंभर गावांच्या इनामाच्या मोबदल्यातही मी माझी विद्या विकणार नाही; आणि त्यावर अजून म्हणजे, जर मी आपल्या मुलांना सहा महिन्यात नीतिशास्त्र निपुण बनवलं नाही तर मी माझं नाव बदलून टाकीन. मी अजून आपल्याला काय सांगू? हा माझा सिंहनाद समजा. मी कुठल्याही प्रकारे पैशाचा लोभी नाही.  मी ऐंशी वर्षाचा आहे. सर्व इंद्रयभोगापासून विरक्त आहे. निरिच्छ झालो आहे. कुठल्याही सुखोपभोगांची मला इच्छा राहिलेली नाही. आयुष्याच्या ह्या पायरीवर मला आता धनाचीही जरुरी राहिलेली नाही. महाराज, केवळ आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विद्येने माझ्या मनाला थोडा विरंगुळा म्हणून हे कार्य स्वीकारीत  आहे. आपण आजची तिथी लिहून ठेवा. आजपासून सहा महिन्यांच्या आत मी जर राजकुमारांना राज-नीती शास्त्रात एकमेवाद्वितीय (त्यांच्यासारखे तेच! त्याहून कोणीही सरस नाही असे) असं बनवलं नाही तर आपण मला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. राजाने मृत्युदंड दिल्यास शास्त्रानुसार मोक्षही मिळत नाही. आपण माझा मोक्षाचा अधिकार अशा प्रकारे हिरावून घेऊ शकता.’’

त्या ब्राह्मणाची ती अत्यंत अवघड/खडतर अशी प्रतिज्ञा ऐकून राजा, मंत्री सर्वजण आश्चर्यचकित होऊन पहातच राहिले. राजाने अत्यंत आदराने विनम्र होऊन आपल्या राजपुत्रांना विष्णुशर्माजवळ सोपवलं आणि तो निश्चिंत झाला.

विष्णुशर्मानी त्या राजकुमारांना बुद्धिमान बनवण्यासाठी मित्रभेद, मित्रप्राप्ति, काकोलूकीयम्, लब्धप्रणाश आणि अपरिक्षितकारक नावाची नीतीशास्त्राची पाच प्रकरणं लिहीली. ती त्या राजकुमारांना शिकवली आणि खरोखरच सहा महिन्यांच्या मुदतीत त्यांना असाधारण विद्वान बनवून दाखवलं.

तेव्हापासून मुलांना नीतीशास्त्रात कुशल आणि व्यवहारचतुर बनविण्यासाठी जगात पंचतंत्र हे नीतीशास्त्र वापरलं जाऊ लागलं आणि हळुहळु सर्वत्र त्याची ख्याती झाली.(हजार वर्षांहून अधिक काळ जगातील अनेक भाषांमधे पंचतंत्राची भाषांतरे झालेली आहेत.)  इतकच काय जो हे नीतीशास्त्र सतत अभ्यासतो, सतत ऐकत राहतो; त्याला इंद्रसुद्धा पराभूत करू शकत नाही.  (10)

 

अधीते य इदं नित्यं नीतिशास्त्रं श्रुणोति च ।

न पराभवमाप्नोति शक्रादपि कदाचन ।। 10 ।।

 

नेमाने नीतिशास्त्राचा । करे अभ्यास जो सदा

एकाग्र चित्त वाचे जो । करी मनन चिंतना ।।

पराभव नसे त्याचा । विजयश्री वरे तया

पराभूत न होई तो । इंद्राकडुन ही कदा ।। 10 ।।

।। असे हे कथामुख येथे संपले. ।।

-------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तंत्र 2 मित्रसम्प्राप्तिः (अनुक्रमणिका)

॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)

3 शबर-शूकर कथा